पालघर - पालघल जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या कारचालकाच्या झालेल्या हत्याकांडाचे पडसाद देशभरात उमटले होते. त्या दिवशी जमावासमोर त्या साधूंनी हसत हसत हात जोडून आपणास मारू नका, अशी विनवणी केली, मात्र संतप्त जमावाने त्यांचे काही ऐकले नाही. उलट पोलिसांसमोरच त्यांना ठार केले. त्यामुळे, राज्याच्या गृह विभागाने याची तात्काळ दखल घेत, याप्रकरणी दोन पोलिसांचे निलंबन केले होते. त्यानंतर, आता येथील पोलीस ठाण्याशी संबंधित ३५ पोलिसांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती आहे.
पालघरमधील या हत्याकांडाला सोशल मीडियावरुन धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे, या घटनेला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, हे गैरसमजातून घडलेले हत्याकांड आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच, याप्रकरणी राज्य सरकारने १०० पेक्षा जास्त आरोपींना ताब्यात घेतले असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले होते. साधूंवर हल्ला होतेवेळी, पोलिसांकडून, ते जमावाला विनवणी करीत होते, मात्र त्यावेळी त्यांचे कोणीही काहीही न ऐकता, दयामाया न दाखवता त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांसमोरच ही घटना घडल्याने सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे, याप्रकरणी पोलिसांवरही कारवाई करण्यात येत आहे.
या पोलीस स्थानकाशी संलग्न असणाऱ्या एकूण ३५ पोलिसांची तातडीने बदली करण्यात आली आहे. सर्वत स्तरांतून या प्रकरणी कारवाईच्या मागणीने जोर धरल्यामुळे लगेचच काही महत्त्वाची पावलं उचलली गेली. ज्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी याआधीच दोन पोलिसांचं निलंबनही करण्यात आले होते. दरम्यान, या परिस्थितीचं गांभीर्य आणि त्याला मिळणारी वळणं पाहता सध्याच्या घडीला पालघर पोलिसांकडून गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींपैकी एक असल्यामुळे त्यांना वारंवार धमकी दिली जात होती, त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला या प्रकरणीचा सर्वतोपरी तपास सुरु असून, त्यावर अनेकांचं लक्ष आहे.