प्रतिक ठाकुर
विरार : करोनामुळे शहर लॉकडाऊन झाल्यापासून गोरगरीब जनतेवर उपासमारीचे वेळ आली आहे. मात्र, या गोरगरीबांचा कुणीतरी वाली असतोच असा प्रत्यय या वृत्तात येत आहे. कारण वसईच्या एका गुप्ता कुटुंबीयांनी आपल संपूर्ण दुकान या गोर-गरिबांसाठी खुले केले आहे. या दुकानाच्या माध्यमातून गुप्ता कुटुंबीय गरिबांना मोफत धान्य देत आहे. यामुळे असंख्य गरजूंची एका दिवसाची भूक भागत असून गरिबांना मोठा दिलासा मिळत आहे.
शहर लॉकडाऊन झाल्यापासून हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे मोठे हाल झाले होते. त्यामुळे हे नागरिक भुकेल्या पोटी पायीच आपल गाव गाठण्यासाठी महामार्गावर निघाले आहेत. याच महामार्गावर ही परिस्थिती वसईच्या कोल्ही चिंचोटी येथे असलेल्या किराना दुकानातून दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता पाहत होते. त्यांना ही कामगाराची परिस्थिती पाहवली नाही आणि त्यांनी या सर्व कामगारांना मोफत धान्यसाठा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुप्ता आता गरीब गरजूं व स्थलांतरीत कामगारांना विनामूल्य धान्यवाटप करत आहेत. तसेच पाण्याची बाटली,धान्य देऊन गरज गरज पडल्यास निवाराही देण्याची व्यवस्था ते करत आहेत.त्यांच्या या समाज कार्यात त्यांचे पाच ही मुले मोलाचा हातभार लावत आहेत.
विशेष म्हणजे या भीषण परिस्थितीत एकीकडे इतर दुकानदार जास्तीचे नफा कमावण्यासाठी चढ्या दराने वस्तू विक्री करत आहेत, तर दुसरीकडे मात्र दुकानदार हरीश्चंद्र गुप्ता सारखी माणसे आहेत जी समाजभान राखत गरिबांना खुल्या हाताने मदत करत आहेत. त्यामुळे समाजात गुप्ता यांनी समाजकार्याचा अनोखा पायंडा पाडला आहे. याचे अनुकरण प्रत्येकाने केल्यास कुणीही गरीब-गरजू भुका राहणार नाही.