वसई : वसई-विरार शहर महापालिका परिसरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधित रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, रुग्णांच्या सेवेसाठी वरुण इंडस्ट्रीज, वालीव, वसई पूर्व येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले असून तेथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण तूर्तास बंद करण्यात आले आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात बुधवारी तब्बल १९८ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत असलेली रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. बुधवारी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून, ४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, तरीही अद्यापही ९४६ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शंभरच्या आसपास रुग्णवाढ होत होती, मात्र बुधवारी त्याच्या दुप्पट वाढ झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
दरम्यान, महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी विरार पूर्वेकडील चंदनसार, रानळे तलाव, नारिंगी विरार पश्चिमेकडील निदान बोळिंज नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव, धानीव, नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क, तर वसई पूर्वेकडील वालीव, वसई पश्चिमेकडील दिवाणमान, नायगाव पूर्वेकडील जुचंद्र येथील महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
सोमवार ते शनिवार या दिवशी वसई पश्चिमेकडील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वसई (डी.एम. पेटीट हॉस्पिटल) तसेच तुळिंज हॉस्पिटल, नालासोपारा पूर्व, बोळिंज अलगीकरण केंद्र, विरार पश्चिम यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. दरम्यान, शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सहभागी असणाऱ्या खाजगी हॉस्पिटल्समध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच कौल सिटी कोविड केअर सेंटर, वसई पश्चिम येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही पालिका आरोग्य विभागाने सांगितले.
जव्हारला बँकेसमोर पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांग
तालुक्यात दोनच राष्ट्रीयीकृत बँका असून होळीचा सण जवळ आल्याने रोजगार हमी व शासनाच्या विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे जव्हारला कोरोना रुग्ण आढळले असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बँकेसमोर लगलेल्या लांबच लांब रांगांनी सामाजिक अंतराचा फज्जा उडाला होता. रोजगार हमीच्या कामांची मजुरी थेट बँकेत जमा होत असते. तसेच शासनाच्या विविध योजनांचे पैसेही बँकेतून मिळतात. होळीचा सण साजरा करण्यासाठी बँकेत जमा झालेले पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. त्यातच लॉकडाऊन पुन्हा होणार अशी चर्चा असल्याने दररोज सकाळी आठ वाजेपासून खेड्यातून नागरिक येत आहेत. तालुक्यात महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन राष्ट्रीयीकृत बँका जव्हारमधील मुख्य बाजरपेठ असलेल्या गांधी चौक येथे आहेत. मुख्य बाजारापेठ आणि रस्त्यावर रणरणत्या उन्हात तासनतास नागरिकांनी, लांबपर्यंत रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्र बैंकेत पैसे काढण्यासाठी झालेल्या या गर्दीने सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.