वाडा - वाडा तालुक्यातील दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मजुरांना पर्याप्त मोबदल्यासह मुबलक रोजगार उपलब्ध होत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर परप्रांताकडे दरवर्षी स्थलांतर होत असते. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, पिण्याला पाणी नाही अशा परिस्थितीत करायचे काय? या चिंतेमुळे यावर्षीही मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले होते. कधी दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महापुर अशा अनेक नैसर्गिक संकटामुळे आर्थिक विवंचनेत असताना आता नवीन एक संकट त्याच्यासमोर उभे राहिले आहे ते म्हणजे कोरोना. या संकटाचा रोजच्या जगण्याच्या लढाईत सामना करायचा कसा ? असा प्रश्न या आदिवासीसमोर उभा राहिला आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलत संपूर्ण देश लॉकडाऊन केला, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी परप्रांतात गेलेल्या मजूरांनी आपल्या घराकडचा रस्ता धरला. अनेक समस्यांना तोंड देत हे मजूर अक्षरशः पायपीट करत आपल्या गावांत दाखल झाले खरे, पण आता पोटाची खळगी भरायची कशी? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. घरात धान्याचा कणही शिल्लक नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घराच्या बाहेर पडावे तर कोरोनाची भीती आणि घरात उपासमार अशा दुहेरी कात्रीत हे आदिवासी मजूर सापडले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. शासनाने गोरगरीब जनतेला ३ महीने धान्य वाटप करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्यापपर्यंत याचा लाभ या आदिवासीना मिळालेला नाही. जाहीर केलेले मोफत धान्य तातडीने देण्याबाबत पावले उचलणे आवश्यक आहे. केवळ धान्य वाटप करुन या गोरगरीबांच्या पोटाची खळगी भरणार नसून यासोबत तेल, मिरची, मीठ,हळद यासारख्या जीवनावश्यक गोष्टीही देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
अनेक आदिवासींकडे रेशनकार्ड नाही, विशेषतः कातकरी बांधव वंचित आहेत, त्यांना रेशकार्ड नसल्याने डावलण्यात येऊ नये. तर पंचनामा करून त्यांना रेशन देण्यात यावे. हातावर पोट असलेल्या या आदिवासींनी लॉकडाऊनच्या काळात जगावं कसं ? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. रोजच्या जगण्याची लढाई लढता लढता माणूस म्हणून जगणंच हरवलेला आदिवासी कोरोनाच्या संकटात मात्र अधिकच हतबल झाला आहे.
वीट धंद्यावर कामासाठी गेलो होतो. परंतु काम अर्धवट सोडून निघून आल्याने मालकाकडून पुरेसे पैसे मिळाले नाहीत. घरी हाताला काम नाही. काम केल्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे आमच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.
- सोमा सगनवार, देसई - कातकरी पाडा
या मजुरांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाची मदत त्यांच्यापर्यंत अजून पोहचलेली नाही. येत्या काही दिवसांत मदत पोहोचली नाही. तर येथील आदिवासी मजूर भुकेने मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- रफीक चौधरी - सामाजिक कार्यकर्ते
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! दिल्लीतील तब्बल 108 डॉक्टर आणि नर्स क्वारंटाईन
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय
Coronavirus : कोरोना हेल्मेट पाहिलंत का?, जनजागृतीसाठी 'त्याने' लढवली अनोखी शक्कल
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार
Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर