पालघर/डहाणू : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या राजस्थानातील १ हजार १७५ कामगार व ३८ विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी डहाणू रेल्वे स्थानकातून एक विशेष ट्रेन जयपूरकडे रवाना झाली. यामुळे ४२ दिवसांपासून विविध निवारा केंद्रांत अडकून पडलेल्या सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून लहान मुलांना घेऊन काही कामगार पायी चालत निघाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या सर्वांना ताब्यात घेत ४४ निवारा केंद्रांद्वारे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करीत अनेक भागांत ठेवले होते. मात्र ४२ दिवसांपासून अडकून पडलेल्या या मजुरांना घराची ओढ लागली होती. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातून वसई येथून पहिली गाडी सोडल्यानंतर सोमवारी डहाणू रोड रेल्वे स्टेशन ते जयपूर या रेल्वे मार्गावर विशेष गाडी रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात आली.
दरम्यान, वसई रोड रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेश राज्याच्या गोरखपूर शहरासाठी पहिली विशेष रेल्वेगाडी शनिवारी रात्री उशिरा सोडण्यात आली. या गाडीतून ११५० मजूर-कामगार रवाना झाल्याची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.