नालासोपारा : राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा फटका अनेक व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांना बसत आहे. त्यामुळे नालासोपारा, वसई, विरार, नायगाव परिसरातील व्यापारी संघटना, दुकानदारांनी विरोध व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी संतप्त व्यापारी, दुकानदारांनी नालासोपाऱ्यात रास्तारोको, विरार येथे पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.संतप्त व्यापाऱ्यांनी आम्ही दुकाने चालू ठेवणार असून किती गुन्हे दाखल करायचे तेवढे करा, आम्ही घाबरणार नसल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संतप्त ७० ते ९० दुकानदार, व्यापाऱ्यांनी नालासोपाऱ्याच्या तुळींज रोडवरील राधाकृष्ण हॉटेलसमोर अर्धा ते पाऊण तास रास्तारोको केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने एक ते दीड तास वाहतूककोंडी झाली होती. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी राज्य सरकारचा आदेश असल्याचे सांगून संतप्त दुकानदार, व्यापाऱ्यांना विनंती केल्यावर ते शांत झाले व वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान, बुधवारी अति आवश्यक सेवा देणारी दुकाने वगळून बाकी दुकाने बंद होती.विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या ठिकाणी असलेल्या दुकानदार, व्यापाऱ्यांनीही निषेध नोंदवला असून दुकाने चालू करणार असल्याची भूमिका घेतली आहे. नालासोपारा येथील कपडा व्यापारी, ज्वेलर्स व्यापारी, दुकानदार असे ६० ते ७० जण वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मंगळवारी दुपारी १ वाजता गेले होते. पण आयुक्तांनी भेटण्यास नकार दिल्यावर मुख्यालयाबाहेर निषेध नोंदवला. शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद ठेवून राज्य सरकारला सहकार्य करणार होतो. पण ३० एप्रिलपर्यंत दररोज दुकाने कशी काय बंद ठेवणार? दुकानांमुळे कोरोना पसरतो का?- जयेश माळी, कपडा व्यापारीनियमांची अंमलबजावणी करावीच लागेलराज्य सरकारने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावीच लागेल, असे सक्त आदेश असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. राज्य सरकारने सुरुवातीला सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. सरकारच्या नियमानुसार आम्ही शनिवार व रविवारी दुकाने बंद ठेवण्यास तयार होतो. शिवाय दुकानात येणारे ग्राहक मास्क, सॅनिटायझर अशा सगळ्याची अंमलबजावणी करतील, याचीही काळजी घेत होतो. मात्र कालपासून ३० एप्रिलपर्यंत दुकाने संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आम्हाला मान्य नाहीत. एक वेळ कोरोनाने आम्ही मरू; पण आमची बायका-मुले, नोकर-चाकर यांना उपाशी ठेवून मरणार नाही. त्यामुळे आम्ही या निर्बंधांचा निषेध करत असून; गुन्हे दाखल झाले तरी चालतील, दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.- बॉबीसिंग राजपुरोहित, अध्यक्ष, नालासोपारा कपडा व्यापारी असोसिएशन
CoronaVirus Lockdown News: वसई-विरारमध्ये व्यापाऱ्यांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:45 AM