नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील पोलीस दलाला कोरोनाचा वाढत असलेला विळखा चिंतेचा विषय ठरत आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही पोलीस वालीव पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सद्य:स्थितीत पालघर जिल्हा पोलीस दलातील ३०१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून २७१ पोलीस कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. २७ जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस गेले अनेक महिने अहोरात्र मेहनत घेत आहेत. तरीही जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. पालघर जिल्हा पोलीस दलालाही त्याचा फटका बसला आहे. आतापर्यंत २५२ पोलिसांना इन्स्टिट्यूशनल क्वांरटाईन केले होते, त्या सर्वांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच ५८ अधिकारी आणि ६६० पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वांरटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ४९ अधिकारी आणि ६२३ पोलीस कर्मचारी कालावधी पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
कोविड सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनाही कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी वसईतील हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. कोरोना मुक्त झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. २००३ साली गेट वे आॅफ इंडिया आणि मुंबादेवी येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी तपास करण्यासाठी नियुक्त केलेल्या टीममध्ये वनकोटी हे होते. त्यांनी या हल्ल्यातील आरोपींना पकडून सदर गुन्ह्याचा उलगडा केला होता.
पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्व अधिकाºयांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात दिली आहे. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना आखल्या आहेत. तर कोरोनातून बरे झालेले पोलीस पुन्हा कर्तव्यावरदेखील हजर झाले आहेत.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पोलीस हवालदार किरण साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचा मृत्यू झाला आहे. नऊ अधिकारी आणि ३७ पोलीस कर्मचारी अद्याप होम क्वांरटाइन आहेत. काही अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कुटुंबांनाही लागण झालेली आहे. ९६ कुटुंबांना उपचार झाल्यावर सोडण्यात आले असून २१ कुटुंबे अजून उपचार घेत आहेत.