- आशिष राणे
वसई : वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्या विवा महाविद्यालयात 50 खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. तसेच उपचार घेणार्या रूग्णांना सकस आहारदेखील उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
मध्यंतरी काही दिवसांपूर्वी वसई-विरारमधील कोरोना रूग्णांची आकडेवारी आणि त्यानुसार लागणारा ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याने काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असल्याचा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर वसईत ऑक्सिजनचा तुटवडा याबाबत सोशल मीडियावर माजी महापौर राजीव पाटील यांनी माध्यमांना आवाहन केल्यावर शासन स्तरावर हालचालींना वेग आला होता. तर प्रशासनाने तातडीने वसईकरांसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम सुरू केले.
दरम्यान, वाढते कोरोना रुग्ण, रुग्णालयात उपचारासाठी बेडची कमतरता, तसेच योग्य प्रकारे ऑक्सिजन आणि रेमडेसीविर इंजेक्शन आदी सर्वच बाबतीतील कमतरता दिसून येत होती. त्यामुळे विवा महाविद्यालयातच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी किमान काही बेड निर्माण करू अशा इच्छेने याठिकाणी 50 बेडचे कोविड सेंटरची उभारणी केली आहे. त्यामुळे नक्कीच ही बाब वसईतील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.