- हुसेन मेमन
जव्हार - अख्या जव्हारकरांची झोप उडवणाऱ्या कोरोना बाधित एसटी चालकामुळे शहराचे ग्रीन झोन मधून रेड झोनमध्ये रूपांतर झाले, तो आता बरा होऊन घरी परतला. त्याचे स्वागत महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
जव्हारमध्ये पहिल्यांदा या एसटी चालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये गुरुवारी आणखी 6 रुग्णाची भर झाली असून, एकूण 69 चा आकडा पार झाला आहे. गुरुवारी बाधित असलेले 6 पैकी 5 ग्रामीण भागातील रुग्ण आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. तसेच, 11 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या 58 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, 19 मे रोजी तो एसटी चालक घोडबंदर येथील मजुरांना सोडण्यासाठी मध्यप्रदेशच्या सीमेवरील शिरपूर शेंदवा येथे गेला होता. तेथून तो 26 जून रोजी एक ग्रामीण भागात फेरी मारली. त्यानंतर तो आजारी पडला. सुरुवातीला खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतर या चालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. आता उपाचारानंतर चालक बरा होऊन घरी परतला आहे. मात्र, जव्हारमध्ये आणखी कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.