बोईसर : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासह अन्य तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांची संख्या व उपलब्ध सोयी-सुविधांकडे गांभीर्याने पाहिले असता जिल्ह्यात सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात बाधितांचा आकडा ६१ हजारहून जास्त झाला असून सध्या ९ हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण सतत वाढत गेल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. कोरोना रुग्णांना, त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला जिल्ह्यात असलेल्या रुग्णालयांत बेड मिळविण्यासाठी अक्षरशः प्रचंड पायपीट करावी लागत आहे. बेड उपलब्ध होत नसल्याने बरेच लोक हतबल होत आहेत. अथक प्रयत्नांनंतर कसाबसा बेड मिळालाच तर तेथे ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केल्या जात आहेत.आज अत्यवस्थ रुग्णांना शहरी किंवा शेजारच्या गुजरात राज्याचा आधार घ्यावा लागतो; परंतु तेथील रुग्णालयांतही बेड उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. दुर्दैवाने काही तर या प्रवासातच शेवटचा श्वास घेत आहेत. त्यामुळे अपूर्ण पडणारी आरोग्य व्यवस्थाच सध्या ऑक्सिजनवर असून, एकूणच परिस्थिती कठीण व भयावह होत आहे.कोरोनाचे जिल्ह्यात आगमन झाल्यापासून शासकीय आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, कर्मचारी, पोलीस, महसूल व ग्रामपंचायत यंत्रणा, आशावर्कर, सफाई कामगार तर काही खासगी रुग्णालयातील यंत्रणेने अहोरात्र धोका पत्करून काम केलेले आहे. त्यामुळे बहुसंख्य रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत. एकूणच आरोग्य यंत्रणेची स्थिती गंभीर होत असून, ती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कोरोनासंबंधित नियम काटेकोरपणे पाळणे सर्वांचे कर्तव्य आहे.
आणखी कोविड सेंटर होताहेत तयारजिल्ह्यात अधिकारी लाइफलाइन बेटेगाव बोईसर येथे ६० खाटांचे, फिलिया हॉस्पिटल ५० खाटा, वरद हॉस्पिटल, बोईसर ५० खाटा, रिलीफ हॉस्पिटल पालघर ४० खाटा, तर शारदा हॉस्पिटल विक्रमगड येथे ४० खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र तरीही वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता बेडचा तुटवडा जाणवणार आहे.