हितेन नाईकपालघर : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्राच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये देशातील टॉप-१० शहरांमधील मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमा पालघर जिल्ह्याला जोडल्या गेल्याने पालघर जिल्हा डेंझर झोनवर उभा आहे. जिल्ह्यातही वाढत्या कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच गंभीर उपाययोजना आखणे गरजेचे बनले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रासह राज्य शासन, रुग्णालये, विविध संस्थांनी पुढाकार घेतला असताना ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग या तीन ट्रीकचा गंभीरपणे वापर करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. विनाकाम बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात दिसून येत असून लग्नसमारंभ आणि येणाऱ्या सणाचे साजरीकरण उत्साहात करण्याचे फॅड कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने अजूनही कमी झाले नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनीही असल्या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर लॉकडाऊन, नोकऱ्या-रोजगारावर गदा, गरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आदी मागच्या मार्चपासून सोसलेल्या हाल-अपेष्टांना पुन्हा सामोरे जाण्याची पाळी जिल्हावासीयांवर ओढवणार आहे.
आजही जिल्ह्यातील मोठा वर्ग नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्ताने मुंबईत जात असून ट्रेन, लोकलचा प्रवास करून जिल्ह्यात येत आहे. दुसरीकडे ठाणे येथून बस प्रवासाद्वारे जिल्ह्यात येणारा प्रवासीवर्ग मोठा आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला मृत्यू हा ठाणे येथून नोकरीनिमित्ताने उसरणी येथे आलेल्या एका तरुणाचा झाला होता. सध्या ठाण्यात दररोज कोरोनाबाधितांच्या आकडा हजारोच्या संख्येने वाढत आहे, तर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, खोडाळा या भागात शासकीय नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचारी, अधिकारी वर्गाची संख्या मोठी असून नाशिक जिल्ह्यातील वाढता कोरोना पालघर जिल्ह्याला मारक ठरू शकतो.
जिल्ह्यात कोरोना तपासणी मोहिमेची कडक अंमलबजावणी गरजेची बनली असून जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेले १९४ प्रतिबंधित क्षेत्र फक्त नावापुरती उरली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे तात्काळ आरटीपीसीआर चाचणी संख्या वाढवली असून कोरोनासदृश लक्षणे असलेल्या सर्व नागरिकांनी स्वतःहून पुढे येत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे बनले आहे.