आशिष राणे वसई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्याला उद्देशून केलेल्या आवाहनाला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने वसईतही रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं. आ. हितेंद्र ठाकूरप्रणीत बहुजन विकास आघाडीने वसई पश्चिमेच्या समाज उन्नती मंडळ सभागृहात सोशल डिस्टन्सिंग व अन्य खबरदारी व उपाययोजनाचे काटेकोर पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.दरम्यान, या शिबिरात खास करून कोरोना योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेले, नवघर माणिकपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर व तैनात असलेले माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी देखील रक्तदान केले.तर त्यांच्यासोबत 80हून अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. त्यानंतर रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिरात बविआचे ज्येष्ठ नेते नारायण मानकर, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, सभापती वृन्देश पाटील, नितीन राऊत, राजेंद्र कांबळी, पुष्पा जाधव, संदेश जाधव, समन्वयक विजय वर्तक उपस्थित होते. तर यातील समाजसेवक अविनाश कुसे, पत्रकार प्रवीण नलावडे व आदींनी रक्तदान देखील केले.
CoronaVirus News : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला दिला प्रतिसाद; कोरोना योद्ध्यानं केलं रक्तदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:32 PM