वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी वसई- विरार व नालासोपारा भागात सर्वाधिक 14 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये वसईतील 2 पुरुष ,नालासोपाऱ्यातील 3 पुरुष व 7 महिला आणि विरार मधील 2 पुरुषांचा समावेश आहे. नालासोपाऱ्यात राहणारे दोन वेगवेगळ्या कुटुंबातील 8 जण एकाचवेळी कोरोना बाधित आढळून आले असून या संख्येने मात्र पालिकेची चिंता वाढली आहे. तर शुक्रवारी वसई- विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातून 6 रुग्ण देखील मुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 189 इतकी झाली आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आढळून आलेल्या नालासोपाऱ्यात दोन वेगवेगळ्या कुटुंबात एकाच घरातील चार- चार जण बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने ते पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांना नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सर्वाधिक 14 बाधित रुग्णाची नोंद झाल्याने पालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.
या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 189 वर गेली आहे तर आजवर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत. तर शुक्रवारी पालिका हद्दीत वसई विरार भागातील एकूण 6 रुग्ण मुक्त झाल्याने आता या मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 101 वर गेली आहे. तर आजवर 80 बाधित रुग्णावर वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत