सुरेश काटेतलासरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता इतर राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकरिता आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. यामुळे शनिवारी सकाळी सात वाजेपासून गुजरात, दमण आणि दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली असून, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथे उभारलेल्या तपासणी नाक्यांमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड येथे सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर अहवाल नाहीत, त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात येत आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यातील सीमा तपासणी नाक्यावर प्रवाशांची तपासणी सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिल्ली, राजस्थान व गुजरात राज्यातील महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सीमा तपासणी नाका अच्छाड, खानवेल येथे सुरू करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड सीमा तपासणी नाक्यावर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली असून, वाहनांतील प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सर्वाधिक वर्दळीचा मानला जातो. मोठ्या प्रमाणात या महामार्गांवरून दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि इतर राज्यांतून प्रवासी महाराष्ट्रात येत-जात असतात. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत.
महाराष्ट्राच्या हद्दीवर छोट्या वाहनांतील प्रवाशांचा निगेटिव्ह अहवाल बघूनच त्यांना सोडले जात आहे. मोठ्या वाहनचालकांची तपासणी दापचरी तपासणी नाका येथे केली जात आहे. - अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे.