वाडा तालुक्यातील कुडूस येथील शिवाजी नगर या परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या महिन्याभरापासून या कामगारांच्या हाताला काम नसल्याने पैसे नाहीत त्यामुळे किराणा सामान वगैरे खरेदी करू शकत नाहीत. जेवढे अन्नधान्य होते तेवढे महिनाभरात संपल्याने आता खायला घरात काहीच नसल्याने सुमारे 60 मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
वाडा तालुक्यातील कुडूस हे उद्योगाचे केंद्रस्थान असून या परिसरात अनेक कारखाने आहेत. तसेच नवीन उद्योगधंदे व इमारतीचे बांधकाम नेहमीच सुरू असते. त्यामुळे परप्रांतीय कामगार तसेच जव्हार ,मोखाडा,विक्रमगड या तालुक्यातील कामगारही कुडूसमध्ये वस्ती करून राहतात. कुडूसमधील शिवाजी नगर या परिसरात बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील परप्रांतीय बांधकाम कामगारही गेल्या अनेक वर्षांपासून राहत असून बांधकाम मजुरांचे काम करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊन केल्याने इमारत बांधकामाची सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे महिन्यापासून त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या जवळ असलेल्या पैशांमधून आणि शिल्लक असलेले अन्नधान्य महिना भरात संपल्याने आता घरात खायला काहीच नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कुडूस ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील 437 मजुर कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांना अन्नधान्य मिळावे असा पत्रव्यवहार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे 16 एप्रिल रोजी केला आहे. मात्र संबंधित प्रशासनाने मोफत धान्य या कामगारांना अद्यापही न दिल्याने या 60 कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे कामगार जय गोविंद प्रसाद यांनी सांगितले.आम्हाला अन्नधान्य द्या नाहीतर आमच्या गावाकडे जाण्यासाठी आमची व्यवस्था करा असे बांधकाम मजुर मोतीलाल बैढा याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान, या 60 कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याने याची दखल कुडूसचे उपसरपंच डाॅ. गिरीश चौधरी यांनी घेऊन त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची तात्पुरती व्यवस्था त्यांनी स्वतः केली आहे.
याबाबतची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
- उद्धव कदम, तहसीलदार, वाडा
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'भाजपा जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा व्हायरस पसरवतोय', सोनिया गांधींचा हल्लाबोल
Coronavirus : ...म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोज झाडावर चढतो 'हा' शिक्षक
Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण
Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू