बोर्डी : डहाणू तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने सव्वाशेचा टप्पा पार केला असून आरोग्य विभाग मागील चार महिन्यांपासून झपाटल्यागत कामाला लागला आहे. पावसाळ्यात जलजन्य आजारांत वाढ होत असते. या परिस्थितीचा सामना करताना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार असल्याने तत्काळ ९१ रिक्त पदे भरण्याची गरज आहे.पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत डहाणू पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात ऐना, आशागड, चिंचणी, धुंदलवाडी, गंजाड, घोलवड, तवा, सायवण आणि वाणगाव या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आणि ६६ उपकेंद्रांचा समावेश आहे. या तालुक्यात ८५ ग्रामपंचायतींतील लोकसंख्येला त्याद्वारे आरोग्य सेवा पुरवली जाते. मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाउन घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात या विषाणूग्रस्त रुग्णांचा आकडा वाढता असून तालुक्यात आजच्या घडीला बाधित रुग्णसंख्या सव्वाशेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. संबंधित गावात रुग्ण सापडल्यावर, त्यासह त्याच्या सान्निध्यात आलेल्यांचे विलगीकरण करून ते क्षेत्र प्रतिबंधित करताना आरोग्य कर्मचारी युद्धपातळीवर कामाला लागला आहे. ही जबाबदारी पार पाडत असतानाच सध्या जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला प्रारंभ झाला आहे. नेहमीप्रमाणे या काळात जलजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचा फैलाव होतो.जिल्हा निर्मितीनंतरही बदलली नाही परिस्थितीआरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या जीवाचे रान करावे लागत आहे. सेवा देताना तालुक्याच्या आरोग्य विभागाला मिळालेल्या मंजूर पदांची संख्या आणि त्यापैकी भरलेल्या पदांची आकडेवारी पाहता हे कर्मचारी अतिरिक्त कामाचा बोजा वाहत असल्याचे दिसून येते.ज्या ठिकाणी सेवा दिली जाते अशा तवा आणि वाणगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेच्या मालकीची इमारत नाही. चिंचणी १ आणि २, धुंदवाडी, घोलवड-१, वाणगाव या उपकेंद्रांचाही यात समावेश आहे. जिल्हा निर्मितीनंतरही ही परिस्थिती बदललेली नाही.
coronavirus: रिक्त पदांमुळे आरोग्य सेवकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला, डहाणूमध्ये ९१ पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 1:45 AM