नालासोपारा/वसई : वसई-विरार मनपा अंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने संपूर्ण वसई तालुक्यात कोरोनाची दहशत आहे. शुक्रवारी कोरोनाबाधित १४ रुग्ण सापडल्याने वसई तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८९ झाली आहे, तर ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०१ झाली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील २३ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. ती कॉलसेंटरमधील कर्मचारी आहे. पूर्वेकडील २२ वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. तो मुंबई येथील रुग्णालयात वॉर्डबॉय आहे. पूर्वेकडील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना झाला असून यात महिला (४५), मुलगी (१३), मुलगी (२३) आणि पुरुष (४५) असे बाधित झाले आहे. हे सर्व रुग्ण कोविड रुग्णांच्या ‘हायरिक्स संपर्का’तील आहेत. त्याचप्रमाणे पूर्वेच्या एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आढळले आहेत. २ मे रोजी याच कुटुंबातील ४६ वर्षीय पुरुष (पंचतारांकित हॉटेलचा कर्मचारी) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तसेच वसई पूर्वेकडील ३४ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडील रुग्णालयात दाखल केले आहे.
वसई पूर्वेकडील ३६ वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. ते मुंबई येथील रुग्णालयात आपली सेवा देत आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वेकडील ४६ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. ते मुंबई येथील बस ड्रायव्हर आहे.विरार पूर्वेच्या २३ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणाला कोरोना झाला आहे. त्याला मनपाच्या वसई पूर्वेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. तर विरार पूर्वेकडील २२ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. तो मुंबई येथील हॉटेलचा कर्मचारी असून त्याला मुंबई येथे ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. दरम्यान, या आजारात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर आजवर ८० रुग्ण उपचार घेत आहेत.