विरार : वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ विभागात कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक पद्धतीने वाढू लागल्यानंतर या प्रभागात पुढील १४ दिवसांचा कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेतीन हजारांच्या पुढे गेला आहे. या आजारामुळे आत्तापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र मागील चार दिवसांत वसई-विरार शहरात आढळून येत असलेल्या कोरोनाग्रस्त नागरिकांचा आश्चर्यजनक वाढता आकडा पाहता आता अधिक खबरदारी महापालिका प्रशासनाला घ्यावी लागत आहे.
नालासोपारा पूर्व परिसरात कोरोनाग्रस्तांचा वेग सर्वाधिक आहे. यात प्रभाग समिती ‘एफ’ हा परिसर मोडतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुढील १४ दिवस या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग समिती एफ अर्थात पेल्हार विभागातील फणसपाडा, खैरपाडा, शिवाजीनगर, वालीव नाका या क्षेत्रामध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. वरील सर्व ठिकाणी महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) करण्याचा निर्णय (बाकी इतर क्षेत्रातील कन्टेन्मेंट झोन तसेच ठेवून) वसई-विरार महापालिकेने घेतला आहे.पेल्हार प्रभागात आतापर्यंत १३८ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्यातील ७८ क्षेत्रांची मुदत संपल्याने ६० प्रतिबंधित क्षेत्रे सध्या देखरेखीखाली आहेत. ६० पैकी सात झोन हे सर्वाधिक मोठे आहेत. आता पुन्हा चार ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रांत समाविष्ट झाली आहेत.