विरार : वसई-विरार महापालिका हद्दीत काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच पालिका हद्दीत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली. सूर्या टप्पा ३ मधून १८५ एमएलडी पाणी २०२२ मध्ये वसई-विरारकरांना मिळणार असल्याचे ही योजना राबवत असलेल्या एमएमआरडीएकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले. देहर्जे धरण प्रगतिपथावर असल्याने त्याचेही पाणी मिळणार आहे, असे या बैठकीत सांगण्यात आल्याने वसई-विरारकरांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. आयुक्तांनी घेतलेल्या पाणी आढावा बैठकीसाठी माजी महापौर प्रवीण शेट्टी, नारायण मानकर, प्रफुल साने, महेश पाटील, पंकज ठाकूर, परिवहन सभापती प्रीतेश पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, जलसंपदा विभाग खोलसा पाडा २ चे कार्यकारी अभियंता एन. डी. महाजन, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये खोलसा पाडा धरण १ व देहर्जे धरण याबाबतही चर्चा करण्यात आली. या कामाबाबतची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव , एमएमआरडीएचे ह. स. सोनावणे यांनी दिली. या बैठकीत अमृत पाणीपुरवठा योजना व ६९ गाव योजनेमधील महापालिका क्षेत्रात समाविष्ट ५२ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. तसेच महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेवर खंडित होणारा वीजपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावरील उपाययोजनांबाबत एमएसईबीचे उपकार्यकारी अभियंता संजय कोल्हे यांनी माहिती दिली. १० एप्रिलपासून कामाला सुरुवातपालिकेच्या मालकीच्या खोलसापाडा धरणाला वनविभागाची परवानगी मिळाली असून या धरणाला ५१.३९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ३१ ऑगस्ट २०१९ ला ही जागा पालिकेच्या धरणासाठी शासनाने आरक्षित केली हाेती तर पालिकेने १९ सप्टेंबर २०१८ ला धरण बांधण्यासाठी ठराव केला होता. कोकण पाटबंधारे विभाग ही योजना राबवत असून यातून पालिकेला १७ द.ल. लिटर पाणी मिळणार आहे. धरण २ बाबत सविस्तर चर्चा झाली असून वनविभागाने करायची कार्यवाही लवकर पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग महाजन यांनी १० एप्रिलपासून सदरचे काम सुरू होईल, असे सांगितले.
coronavirus: वसई-विरारकरांना मिळणार राेज 185 दशलक्ष लीटर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 3:26 AM