पारोळ : ‘कोरोना’च्या धास्तीमुळे शासनाने शाळा-महाविद्यालने ३१ मार्चपर्यंत बंद केल्यानंतर आता शहरातील दुकाने, बाजारपेठा, हॉटेल्स, ढाबेदेखील बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक सेवा सुरू असली तरी कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेला प्राधान्य दिले जात आहे. वसई-विरारमधील वर्दळीचे सर्व रस्ते आता वाहतूककोंडीमुक्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार वसई-विरार महापालिकेसह जिल्ह्यातील नागरिक ‘जनता कर्फ्यू’साठी सज्ज झाले आहेत.कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचे आदेश सरकारी यंत्रणांना दिले आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनासाठी वसई-विरारकर सज्ज झाले आहेत. कधी नव्हे ते वसई-विरार, मुंबई व आजूबाजूची महत्त्वाची शहरे ठप्प झाली आहेत. ओसंडून वाहणारे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे मोकळी झाली आहेत. सर्वत्र शुकशुकाट पसरल्याने शहरांनी प्रथमच मोकळा श्वास घेतला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून वैद्यकीय यंत्रणांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच हा रोग संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हस्तांदोलन करणे टाळा, खोकताना, शिंकताना घ्यावयाची काळजी अशा अनेक नियमावल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात वैद्यकीय यंत्रणा यशस्वी ठरली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आले आहेत.कोरोनाच्या भीतीमुळे सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या अफवांमुळे आधीच चिकन, मच्छी व्यवसायाला फटका बसला होता. त्यात आता गर्दी होऊ नये याकरिता मटणाची दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत. त्याचा फटका मटण विक्र ेत्यांना बसला असून खवय्यांचे मात्र हाल होत आहेत. तसेच हातावर पोट ठेवून असलेल्या रिक्षा चालकांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे. सर्वत्र शुकशुकाट असल्याने रिक्षा चालकांना प्रवासी मिळेना झाले आहेत. वसईत राहणारे परंतु ठाणे, मुंबई व आजूबाजूच्या शहरांत रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवणाऱ्या रिक्षाचालकांना त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. काही छोटे-मोठे रिक्षाचालक शुकशुकाट असतानाही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत.सोशल मीडियावर मेसेज व्हायरलनायगाव परिसरातील विजय पार्क परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला असून सर्वांनी खबरदारी घ्या, असा मजकूर गुरुवारी सोशल मीडियावर फिरत होता. मात्र ती निव्वळ अफवा असल्याचे वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वसई-विरारमध्ये अद्याप कोरोना विषाणूबाधित असलेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.महापालिका, विभागीय कार्यालये बंदचा निर्णयजगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या धसक्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय आणि पालिकेची इतर नऊ विभागीय कार्यालयेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच शुक्र वारी होणारी अर्थसंकल्पासंदर्भातील सभा व इतर सभाही पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याच्या सूचना प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.
Coronavirus : ‘जनता कर्फ्यू’साठी वसईकर सज्ज, नायगावमध्ये रुग्ण आढळल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:13 AM