- जगदीश भोवडपालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनानेही कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने निर्बंध जारी केलेले आहेत, तरीही अनेक लोक विनामास्क बाजारांत, रेल्वे प्रवासांत फिरताना दिसत असल्याने आणि त्यातीलच कुणी बाधित झाला तर त्याला तो आजारी पडत नाही तोपर्यंत माहिती पडत नाही; मात्र तोपर्यंत त्याने अनेकांना कोरोनाची भेट दिलेली असते. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये १ ते २८ मार्चदरम्यान ३ हजार ६७७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, या कालावधीमध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. दरम्यान, पालघर ग्रामीण भागात बुधवारी ११४, तर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये २१९ रुग्ण सापडले. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आजवर बाधित रुग्णांचा आकडा ५० हजारपेक्षा अधिक झालेला आहे, तर बाराशेहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारा आकडा पाहता नागरिकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे; परंतु तरीही अनेक लोक बेफिकीरी दाखवत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. बाधित झालेली व्यक्ती ही मध्यंतरीच्या काळात अनेकांना भेटलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक तसेच मित्रमंडळी यांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. लोकलमध्ये वाढताहेत विनामास्क प्रवासी पालघर जिल्ह्यातील बरेच लोक मुंबई तसेच ठाणे येथे नोकरी-धंद्यानिमित्त जात-येत असतात. त्यांचे प्रवासाचे साधन लोकल रेल्वे तसेच एसटी बसेस हेच आहे. त्याचप्रमाणे काही लोक स्वत:च्या वाहनांद्वारे प्रवास करीत असतात; परंतु लोकल प्रवासामध्ये बहुसंख्य लोक कोरोना नियमांचे पालन करताना आढळत नाहीत. बरेच लोक मास्क हनुवटीच्या खाली ठेवून बसलेले असतात. त्यांना नियम पाळणारे काही प्रवासी मास्क वापरण्यास सांगतात, तेव्हा हमरीतुमरीचे प्रकारही घडताना दिसत आहेत.
coronavirus: संसर्ग पसरवणाऱ्यांना कोण आवरणार? कोरोना वाटत फिरणाऱ्यांविषयी चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 2:34 AM