वसई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तथा वसई-विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार जवळपास सर्वच प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत. कोरोना या जीवघेण्या विषाणूची लागण शहरवासीयांना होऊ नये याकरिता पालघर जिल्हाधिकारी तथा आयुक्तांमार्फत राज्य शासनाच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. यासाठी जनतेनेदेखील या विषाणूचा प्रादुर्भाव आपणांस होऊ नये, याकरिता सहकार्य करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे जाहीर आवाहन केले आहे.वसई-विरार शहर परिसरातील सर्व चर्च खुले राहणार असल्याची बातमी काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. याबाबत पालघर जिल्हाधिकारी तथा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यानी वसईचे आर्च बिशप डॉ. फिलिक्स मच्याडो यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून कोरोना विषाणूबाबत शासन करीत असलेल्या उपाययोजना व शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार राज्य शासनाच्या व पालघर जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन व सहकार्य करणार असल्याचे आश्वासन डॉ. फिलिक्स मच्याडो, आर्च बिशप, वसई यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांना दिल्याची माहिती महापौरांच्या स्विय सचिव दिगंबर पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.येत्या ४ एप्रिलपर्यंत होणार नाहीत प्रार्थनाशुक्रवारी मध्यरात्रीपासून ते येत्या ४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वसई परिसरातील कोणत्याही चर्चमध्ये प्रार्थना होणार नाहीत, असेही आर्च बिशप यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धी पत्राद्वारे व व्हिडीओमध्ये म्हटले आहे. भाविकांनी यादरम्यान घरीच प्रार्थना करा, स्वत:चे रक्षण करा, असा संदेश देखील आर्च बिशप डॉ. मच्याडो यांनी दिला आहे.
Coronavirus : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणार, आर्च बिशप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:07 AM