विरार : प्लास्टिक बंदी करून एक वर्ष झाले असले तरी वसई तालुक्यात अनेक ठिकाणी बिनधास्तपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. या बेकायदेशीर प्लास्टिक विक्रेत्यांवर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करून १० लाखांचा दंड वसूल केला आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदी असली तरी अजूनही दुकानांमध्ये तसेच घरी प्लास्टिकचा वापर सुरू आहे. महानगरपालिकेने अनेकदा याबाबतीत आळा घालण्याचा प्रयत्न केला असला तरी यात तेवढे यश आलेले नाही. यामुळेच महानगरपालिकेने प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली आहे. काही दिवसांपासून महानगरपालिकेने ही मोहीम अधिकच तीव्र केली असून ठोस कारवाई केली आहे. वसई - विरार महानगरपालिकेच्या परिसरात बसणा-या फेरीवाल्यांपासून मोठ्या बाजारपेठेत बसणा-या फळ तसेच भाजी विक्रेत्यांपर्यंत तपासणी करण्यात आली. यावेळी ४० हजारहून अधिक दुकानांची तपासणी झाली. तसेच चारशेहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.प्लास्टिक विक्रेत्यांवर महानगरपालिकेतर्फे ठोस कारवाई होत नसल्याने प्लास्टिकचा वापर कमी होण्याऐवजी वाढत होता. महानगरपालिकेतर्फे वसई, नालासोपारा, वालीव, बोळींज, चंदनसार अशा प्रत्येक प्रभाग समितीची तपासणी करण्यात आलेली आहे. यावेळी महानगरपालिकेने १० लाखांचा दंड वसूल केला आहे.अनेकदा जनजागृती करून देखील आणि प्लास्टिक बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरणाचा ºहास होत आहे. तर महानगरपालिकेने नागरिकांना तसेच फेरीवाल्यांना व दुकानदारांना प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. ही मोहीम अशीच सुरु राहील, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.वसई तालुक्यात पूर्णपणे प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी महानगरपालिकेने ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही कारवाई अशीच पुढे सुरु राहणार आहे. प्लास्टिक बंदीचा नियम पाळला जाणे गरजेचे आहे.-वसंत मुकणे, वसई- विरार महानगरपालिका, स्वच्छता विभाग अधिकारी
प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची कारवाई, १० लाखांपर्यंतचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 11:53 PM