भार्इंदर : पालिकेने २०१३-१४ पासून बाजार करवसुलीसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांपैकी ३ ठेकेदारांनी बाजार करापोटी वसूल केलेल्या २ कोटी ६० लाख २३ हजार रु.चे धनादेश पालिकेला दिले होते. परंतु, ते वटलेच नसल्याने पालिकेने त्यांना काळ्या यादीत टाकून त्या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हा न्यायालयात त्यांच्याविरोधात दावा ठोकला आहे.पालिकेने २०१३-१४ मध्ये बाजार करवसुलीसाठी सायमन अल्मेडा यांच्या सिमरन एंटरप्रायझेस, देवानंद किणी यांच्या एकवीरा एजन्सीज व अब्दुल रहिम खान यांना ठेका दिला होता. पालिकेने त्यांच्या जागी इतर ठेकेदारांना संधी न देता त्यांना २०१५ पर्यंत सतत मुदतवाढ दिली. या ठेक्यासाठी पालिकेत अनामत रक्कम जमा बँक गॅरंटीच्या माध्यमातून जमा करावी लागत असली तरी काही ठेकेदारांनी बँक गॅरंटीकरिता आपल्या बोगस मालमत्ता दर्शविल्याचे माहिती अधिकारातून यापूर्वीच उजेडात आले आहे. हा प्रकार तत्कालीन कर निर्धारक व संकलकांनी नजरेआड करीत राजकीय वरदहस्त लाभलेल्या त्या ठेकेदारांना अभय दिले होते. त्यामुळे ठेक्यावर गंडांतर न येता बाजार कर नित्यनेमाने परंतु निश्चित दरापेक्षा अधिक वसूल होत गेला. या बाजार कराची वसुली पालिकेत निश्चित दराप्रमाणे जमा करणे बंधनकारक असल्याने यातील सिमरन एंटरप्रायझेस, एकवीरा एजन्सीज व अब्दुल रहिम खान यांनी पालिकेत अनुक्रमे ९७ लाख ७५ हजार रु., १ कोटी ५८ लाख रु. व ४ लाख ४८ हजार रु. १५ ते २० धनादेशाद्वारे २०१५ मध्ये जमा केले होते. पालिकेने हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते वटलेच नसल्याचे उजेडात आल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाने बाजार कराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी आॅगस्ट २०१५ मध्ये ठाणे जिल्हा न्यायालयात ठेकेदारांविरोधात दावा ठोकला आहे.
पालिकेने ३ ठेकेदारांना टाकले काळ्या यादीत
By admin | Published: November 09, 2015 2:34 AM