वसई : वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा स्थित नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा तथा बांधकाम व्यावसायिक अमित पेंढारी याला वालीव पोलिसांनी हत्येची सुपारी दिल्या प्रकरणी अटक केली आहे. ज्या तरुणांना हत्येची सुपारी दिली होती, त्यां मित्रांच्या पेल्हार येथे झालेल्या ओल्या पार्टीत चुकून गोळी सुटून एकाचा मृत्यू झाला होता.या एकूणच पेल्हार गोळीबार प्रकरणात वालिव पोलिसांनी एका आरोपीला यापूर्वीच अटक केली आहे.वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणवठेपाडा येथे शुभम बुमक (१७) घोडबंदर या तरुणांचा घरात मृतदेह आढळळा होता. आदल्याच दिवशी तो आपल्या मित्रांकडे पेल्हार येथे दारूच्या पार्टीसाठी गेला होता. त्यावेळी कैलास वाघ या मित्राकडील पिस्तुलातून चुकून गोळी सुटून त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर कैलास वाघ, दिपक मलिक आणि अनिल सिंग हे तिघे जण फरार झाले होते. मात्र वालिव पोलिसांनी कैलास वाघ याला लगेचच अटक केली होती. चुकून गोळी सुटल्याचे वाघ याने पोलिसांना सांगितले होते.मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मयत शुभम आणि त्याच्या तीन साथीदारांना चाळ बांधकाम व्यावसायिक म्हणून जावेद अन्सारी या व्यक्तीच्या हत्येची सुपारी मिळाली होती, आणि त्यासाठी हे चौघे वसईत आले होते.याप्रकरणी वालीव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आणि वसई विरार महापालिकेची नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित यास हत्येच्या सुपारी प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. त्यास कोर्टात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मात्र त्याने या हत्येची नेमकी सुपारी का दिली आणि या प्रकरणामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का त्याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले.गुन्हा कधी लपत नाही ?- गंभीर म्हणजे पेल्हार गोळीबार प्रकरणातील आरोपी कैलास वाघ यांस सुरवातीला पोलिसांनी अटक केल्यावर त्याच्या झाडाझडतीत व पोलीस चौकशीत आरोपी वाघ याने अंडरवर्ल्डशी संबंधित अशा नामचीन टोळीचे नाव घेऊन वालिव पोलिसांची दिशाभूल केली होती.तद्नंतर पुन्हा एकदा कसून चौकशीत खरे सत्य उजेडात आले, त्यामुळे या गुन्हयात नेमके कोण कोण सहभागी आहेत हे मात्र आता अमित पेंढरीला ३ दिवस मिळालेल्या पोलीस कोठडीतून बाहेर येईल.
नगरसेविकेचा बिल्डर पुत्र अमित पेंढारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 2:21 AM