नालासोपारा : पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क परिसरातील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरुण जाधव यांना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तुळींज पोलिसांनी आचोळे रोडवरील डी मार्ट परिसरातून अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधली म्हणून त्यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या जाधव याला अखेर दीड महिन्यांतर तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. जाधवला वसई न्यायालयात हजर केले असता १ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.नेमके काय आहे प्रकरण....अरु ण हरिश्चंद्र जाधव याने मौजे मोरे येथील सर्व्हे क्र .९९ हिस्सा क्र .३ वर सिडकोची बनावट परवानगी दाखवून सिद्धीविनायक नावाची बहुमजली इमारत उभारली होती. ही इमारत तयार करून त्यातील सदनिकांची विक्री करण्यासाठी जाधव यांनी बनावट परवानगीचा वापर केल्याचा अभिप्राय उपसंचालकांनी पडताळणीनंतर दिला होता. तसेच बांधकाम आणि ते करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे आदेश नगररचना विभागाने सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानंतर पालिकेने जाधव यांना नोटीस बजावली, तरीही या बांधकामाचा वापर करण्यात येत होता. पालिककेकडे ठोस पुरावे असतानाही त्यांच्या या इमारतीवर कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. ते सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक असल्यामुळे राजकीय दबावाखाली कारवाई करण्यात येत नव्हती. त्यानंतर प्रेमसिंग यांची बदली झाल्यामुळे हे प्रकरण रेंगाळले होते. त्यानंतर बदलून आलेले सहाय्यक आयुक्त विजय चव्हाण यांनी या प्रकरणाचा अभ्यास करून १२ एप्रिलला तुळींज पोलीस ठाण्यात तक्र ार केली होती.
अवैध बांधकामप्रकरणी नगरसेवक जाधवला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 1:03 AM