शशी करपे, वसईगेल्या काही वर्षांपासून ठेका पद्धतीवर काम करणारे २ हजार ८४४ कंत्राटी कर्मचारी १ फेब्रुवारीपासून कायमचे कमी करताना कोट्यवधी रुपयांची खरेदी करणारा भांडार विभाग मोडीत काढीत वसई विरार महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिकेतील ठेकेदारांच्या मक्तेदारीला सुुरुंग लावला आहे. यानंतर साफसफाई विभागाची सफाई करून पालिकेत असलेली राजकारणी आणि अधिकाऱ्यांची ठेकेदारीमधील मक्तेदारी संपुष्टात आणण्याचे काम लोखंडे करणार आहेत. तर नगररचना विभाग आपल्या अधिपत्याखाली आणत आयुक्तांनी बिल्डर लॉबीला हादरा दिला आहे.आकृतीबंधानुसार वसई विरार पालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ८५७ इतकी मर्यादित असली पाहिजे. मात्र, वसई विरार पालिकेत ही मर्यादा ओलांडली असून कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल ५ हजार ७०० पर्यंत पोचली होती. त्यामुळे आस्थापना खर्च तब्बल ३५ टक्यांहून पुढे गेला होता. यावर अंतर्गत आॅडिटमध्ये ताशेरेही ओढण्यात आले आहेत. म्हणून आयुक्त लोखंडे यांनी १ फेब्रुवारीपासून ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या २ हजार ८४४ कर्मचाऱ्यांना कायमची रजा दिली आहे. यामुळे पालिकेचे तब्बल ४४ कोटी रुपये वाचणार आहेत. कर्मचारी कमी केले असले तरी आवश्यकतेनुसार आऊडसोर्सिंगच्या माध्यमातून कामे केली जाणार आहेत. भांडार विभागामार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची खरेदी होत होती. यातील गोंधळामुळे लोखंडे यांनी हा विभागच बंद केला. आता प्रत्येक विभागामार्फत साहित्यांची खरेदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या विभागात एकच अधिकारी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसला होता. मध्यंतरी आयुक्त लोखंडे यांनी त्यांना सहाय्यक आयुक्त बनवून त्याची प्रभाग समितीवर रवानगी केली होती. पण, अधिकारी आणि राजकारण्यांची घनिष्ट मैत्री असलेला हा अधिकारी काही दिवसातच पुन्हा आवडत्या भांडार विभागाचा प्रमुख झाला होता.
महापालिकेतील ठेकेदारांच्या मक्तेदारीला सुरुंग
By admin | Published: February 02, 2016 1:47 AM