मोखाडा : तालुक्यातील दाडवळ ग्रामपंचायतीमधील आदिवासी गरजू शेतकऱ्याच्या जनावरांच्या वर्षभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीने तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत गतीमान पाणलोट विकासा योजनेच्या माध्यमातून केलेल्या तीन बंधाऱ्यांच्या खोदकामात लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तीन बंधऱ्याच्या बांधमकामासाठी शासनाने ५६ लाखाची तरतूद करण्यात आली होती. व त्या अनुषंगाने सन २०१४ च्या अखेरीस या कामाच्या बांधकामला प्रशासकीय मान्यता देण्यात आली व एप्रिल २०१५ मध्ये तिन्ही बंधाऱ्याच्या फाऊंडेशनचे खोदकाम यंत्रांच्या सहाय्याने करण्यात आले यामध्ये काम कमी व खर्च जास्त अशी स्थिती आहे व यासाठी गतिमान पाणलोट विकास योजनेमधून दांडवळ या गावातील तीन बंधऱ्याच्या कामासाठी ५६ लाख रूपयांची तरतुद असुन जवळपास ८ लाखांचा खर्च झाला असल्याचे कृषी विभागाने लोकमतला सांगितले. मात्र खर्चाच्या तुलनेत हे काम थातूर माथूर असून काम कमी व खर्च जास्त केला आहे. यामुळे या कामामध्ये मोठा आर्थिक गैर व्यवहार झाला असल्याची बाब समोर आली आहे.परंतु ग्रामीण पाणलोट विकास योजनेअंतर्गत ५६ लाखाच्या निधीची तरतूद व यानिधीमधून यंत्र सामुगीच्या सहाय्याने केलेल्या खोदकामावर ८ लाखाचा खर्च झाला असतांनाही आता शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून हेच काम नव्याने चालू करणार असल्याचे माहिती मंडळ अधिकारी एम आर परदेशी यांनी लोकमतला दिली. यामुळे या कामावर अगोदरच लाखोचा खर्च झाला असतांनाही आता त्याच कामावर पुन्हा नव्याने खर्च होणार आहे यामुळे यापूर्वी झालेल्या खर्चाचे काय? त्यामुळे शासनाची दिशाभूल करून निधीच्या रकमेचा अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने आदिवासी शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे. तसेच खोदकाम करण्यात आलेले बंधारे एकाच ठिकाणी एकासमोर एक असे ३० ते ३५ मीटरच्या अंतरावर असून शेतामध्ये बंधाऱ्याच्या फाउंडेशनचे खोदकाम करण्यात आलेले आहे. यामुळे या खोदकामातील मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहाने लागवड केलेल्या शेतात येत असल्याने नुकसान होऊन उत्पादन देखील घटले आहे. यामुळे शेतकऱ्याकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असून कारवाईची मागणी केली जात आहे.(वार्ताहर)हे काम जलयुक्त शिवार मधून केले जाणार आहे तशी प्रशासनाकडे मागणीही करण्यात आली आहे. - एम आर परदेशी, मंडळ अधिकारी मोखाडा.
दांडवळ येथील बंधाऱ्याच्या खोदकामात भ्रष्टाचार
By admin | Published: July 05, 2016 2:33 AM