प्रशांत माने।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण पश्चिम, पूर्व, ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांकडून जाहीर सभा आणि रॅलीवर भर दिला जात असताना, नगरसेवकांची फळीही जोमाने प्रचारात उतरली आहे. बैठका, प्रभागांतील पदयात्रांसह व्यक्तिगत भेटीगाठींकडे नगरसेवकांचा कल असला तरी, कल्याण पश्चिम आणि पूर्व मतदारसंघात काही नगरसेवक बंडखोरांच्या प्रचारातही मग्न असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.
कल्याण परिक्षेत्राचा विचार करता केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ५३, भाजपचे ४३, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, मनसे १०, बसपा १, एमआयएम १ असे नगरसेवक निवडून आले. डोंबिवलीत शिवसेनेचे १२, कल्याण ग्रामीण आणि पूर्व भागात एकूण १७ नगरसेवक असून, कल्याण पश्चिममध्ये सर्वाधिक २१ नगरसेवक आहेत.
भाजपचे डोंबिवलीत १९, तर कल्याण ग्रामीण आणि पूर्व मिळून १८ नगरसेवक, तर कल्याण पश्चिमेत सात नगरसेवक आहेत. काँग्रेसचे डोंबिवलीत ३, तर कल्याण पूर्वेत १ नगरसेवक आहे. कल्याण पश्चिम आणि ग्रामीणमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. राष्ट्रवादीचेही कल्याण पश्चिमेत दोनच नगरसेवक आहेत. डोंबिवली, कल्याण पूर्व आणि ग्रामीणमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही. मनसेचे कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीत प्रत्येकी चार, तर कल्याण ग्रामीणमध्ये १ नगरसेवक आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात उल्हासनगरमधील १० प्रभागांचा समावेश होतो. यात आठ नगरसेवक शिवसेनेचे, तर साई पक्षाचे दोन नगरसेवक आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मोडणाऱ्या दिवा भागात ११ प्रभाग आहेत. यात आठ नगरसेवक सेनेचे, तर तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत.
शिवसेना आणि भाजपकडे नगरसेवकांची भक्कम फळी आहे. आघाडीकडे आणि मनसेकडे नगरसेवकांचे फारसे बळ नाही. दरम्यान, प्रभागातील मतदारांचा संपर्क ठेवण्याबरोबरच बैठका, पदयात्रांवर भर देण्याच्या सूचना नगरसेवकांना करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने नगरसेवक कामालाही लागले आहेत.
नगरसेवक बंडखोर उमेदवारांच्याही दिमतीलाकल्याण पश्चिम आणि पूर्व मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हान उभे ठाकले आहे. कल्याण पश्चिमेत भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी, तर पूर्वेत शिवसेनेचे उल्हासनगरमधील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीवरून नेत्यांनी कारवाईची तंबी दिली असली, तरी पूर्वेतील शिवसेनेच्या २६ नगरसेवकांनी बोडारे यांना पाठिंबा दिला आहे. ते त्यांचा प्रचार करत आहेत. विशेष बाब म्हणजे पूर्वेतील भाजपचा एक नगरसेवक उघडपणे बोडारेंचा प्रचार करीत आहे. दुसरीकडे पश्चिमेतही पवारांच्या पाठीशी भाजपचे दोन नगरसेवक आहेत. त्यांनी नरेंद्र पवारांच्या प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला आहे.