- आशिष राणे
वसई : पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाकडून आता वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोव्हिड रुग्णालयांना केंद्र निहाय रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती वसई विरार वैद्यकीय आरोग्य विभागाच्यावतीने आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी 'लोकमत'ला दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या या आदेशानुसार आता जिल्ह्यात रेमडेसिवर इंजेक्शनचे केंद्रीय व रुग्णालय निहाय पद्धतीने वाटप केले जाणार आहे.
वैद्यकीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये रेमडेसिवर इंजेक्शनचे वाटप हे केंद्रीय पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या सक्रीय रुग्णांच्या आकडेवारीनुसार यापुढे संबंधित त्या -त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी रेमडेसिवर इंजेक्शनचे वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर, जिल्हा पालघर कार्यालयाकडून दि.17 एप्रिल, 2021 रोजी निघालेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ‘फक्त खाजगी’ (DCHC/DCH) रुग्णालय निहाय रेमडेसिवर इंजेक्शन पुरवठ्याबाबत वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सविस्तर माहिती सादर करण्यात आली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशान्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर, जिल्हा पालघर कार्यालयाकडून वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोव्हिड रुग्णालय निहाय रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास सुरुवात झाल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले.