वसई : नालासोपारा पश्चिमेकडील एका इमारतीच्या घरात सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानासह तीन जण जखमी झाले.नालासोपारा पश्चिमेकडील अस्टर सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील सुरेश शिंदे यांच्या घरी सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्कीेटमुळे आग लागली. शिंदे यांच्या घरातील एअर कंडीशनमध्ये बिघाड झाल्यामुळे शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. आग लागल्यानंतर शिंदे कुटुंबियांनी इतरांना सावध करून इमारतीबाहेर काढले. तसेच महापालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाचे कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आग थोडी पसरत चालली होती.परंतु, घरातील दोन गॅससिलेंडरचे अचानक एका पाठोपाठ स्फोट झाले. त्यामुळे बिल्डींग आणि परिसर हादरून गेला. तर आग विझवण्यासाठी घरात गेलेला अग्नीशमन दलाचा जवान विक्रांत पाटील स्फोटामुळे पसरलेल्या आगीच्या तडाख्यात सापडून होरपळला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोन तरुणही आगीत जखमी झाले. जखमींवर नालासोपाऱ्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.आग लागल्यानंतर दोन गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने पसरलेल्या आगीने शिंदे यांच्या घरातील सामान जळून खाक झाले. शिंदे कुटुंबियांची तत्परता, अग्नीशमन दलाच्या जवानांची तातडीने मिळालेली मदत आणि नागरीकांच्या सहकार्यामुळे जीवीत हानी झाली नाही. मात्र, शिंदे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या आठवड्यात याच इमारती जवळ असलेल्या एका इमारतीत शॉर्टसर्कीने आग लागली होती. तर त्याआधी वसईतही मोठी आग लागली होती. (प्रतिनिधी)
नालासोपाऱ्यात आग
By admin | Published: March 08, 2017 2:59 AM