कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून भातपिकासाठी पोषक असा पाऊस झाला होता. रोगराईही कमी त्यामुळे भातपीक चांगले असल्याने अधिक उत्पन्न मिळणार या आशेने बळीराजा सुखावला होता. मात्र, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे कापणीच्या हंगामात आलेले भातपीक शेतातच कोलमडून आडवी पडली आणि शेती सतत पाण्याने भरून राहिल्याने काही ठिकाणी कुजून गेली. सतत ओलाव्यामुळे उशिरा भारोपणी केलेल्या पिकांचे दाने पुन्हा उगवले. अशा स्थितीतही शेतीचे मोठे नुकसान झाले असतांनाही शेतक-यांनी थोडाफार खर्च वसूलीच्या हेतूने भातकापणीस सुरूवात केली.मात्र भातकापणीस मजूराच मिळत नाहीत. मजूरांच्या टंचाईमुळे मजूरांनी जास्त मजूरीची मागणी केली. वर्षभरापूर्वी २०० ते २५० रूपय व दुपारी एकवेळचे जेवणावर असलेले मजूर आता २५० ते ३०० रुपये मजूरीची मागणी करू लागलेत. त्यातही वाडा, भिवंडी, पालघर, वसई परिसरातील शेतकºयांनी दिवसभराच्या जेवणासह ३०० ते ३५० रू मजूरी देवून कासा, सायवन, गंजाड, तलवाडा भागातील मजूर कापणीस नेल्याने कासा परिसरात मजूरांची टंचाई झाली आहे. आधीच नुकसान त्यात भातशेतीची कापणी लांबणीवर गेल्याने शेतकºयांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी एक दोन मजूर हाताशी घेवून घरच्या मंडळीसह भातकापणी करत आहेत. तर ज्या ठिकाणी जास्तच नुकसान झाले आहे. तेथील भातशेती कापणी न करतातच शेतकºयांनी सोडून देण्याची वेळ आली आहे.
कासा परिसरामध्ये भातकापण्या रखडल्या; पावसाच्या लपंडावाने पारंपरिक शेती तोट्यात, घरच्या माणसांकडून शेतीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:13 AM