वसई : या तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या दप्तरात बेकायदा फेरफार केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, लिपीक, सदस्यांसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लिपीकाला अटक करण्यात आली असून इतरांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खाजगी, सरकारी जमिनींवर झालेल्या बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र देणे, घरपट्टी लावणे यासाठी मासिक सभेच्या ठरावाच्या इतिवृत्तात बेकायदेशीर खाडाखोड करून अपहार केल्याप्रकरणी वसई पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुदाम इंगळे यांनी वालीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून तत्कालीन सरपंच शकुंतला पाटील, उपसरपंच संकेत पाटील, ग्रामविकास अधिकारी आर. के. थोरात, लिपिक राजन म्हात्रे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश भोईर, नंदकुमार रावते, मीनाक्षी घाटाळा, रामकृष्ण कोम, प्रेमा काटेला, माणिक गोवारी, पुष्पराज म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लिपीक राजन म्हात्रे याला अटक केली असून सध्या कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर दहा आरोपींना अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.चंद्रपाडा ग्रामपंचायतीत २०१४ ते २०१६ या कालावधीत बांधकामांना ना हरकत दाखले व घरांना घरपट्ट्या लावताना मासिक सभेच्या इतिवृत्तात खाडाखोड करून बेकायदेशीर बदल करण्यात आले आहेत.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी केलेली कृत्य व कार्यवाही यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. पंचायतीचे अभिलेख व नोंदवह्या सचिवाच्या अभिरक्षेत ठेवणे व त्याची व्यवस्था करणे बंधकारक आहे. असे असतांना अधिकारी व सदस्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी संगनमताने इतिवृत्तांमध्ये फेरबदल केल्याचा ठपका पंचायत समितीने ठेवला आहे.
चंद्रपाडा ग्रामपंचायत घोटाळा प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 3:48 AM