मीरा रोड - मीरा रोड येथील एका आश्रमातील वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वृद्धाश्रमातील महिला कर्मचारी तेथील एका वृद्धेला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे आश्रमातील वृद्धांचा छळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. मीरा गाव येथील अमर पॅलेसजवळ आधार वेलनेस सेंटर हे आश्रम वृद्ध महिलांची सेवा करते. हे वृद्धाश्रम आजारग्रस्त महिलांसाठी दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. येथे सध्या 13 वृद्ध महिला वास्तव्यास आहेत.
दोन दिवसांपूर्वी मीरा रोडमधील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राजीव सिंग यांनी वृद्धाश्रमातील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये आश्रमातील कर्मचारी ललिता पुजारी (वय ४२ वर्ष) ७४ वर्षांच्या मोनिका मकासरे यांना मारहाण करत असल्याचे समोर आले. आपच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी धाव घेत तक्रार अर्ज दिला. पण व्हिडीओ नेमका तिथलाच आहे का ?,यावर तपास करू आणि नंतर निर्णय घेऊ, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. विशेष देसाई यांनी मात्र सदर प्रकार आपल्याच आश्रमातला असल्याचे सांगून घडलेला प्रकार आपणासाठी धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी आपण काळजीवाहु कर्मचारी ललिताला सेवेतून निलंबित केल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना होणार नाही, याबाबत खबरदारी घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
आश्रमातील मारहाण प्रकरणासंदर्भात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. शिवाय, ललिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.