मंगेश कराळेनालासोपारा : वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व चोरी करणाऱ्या दुकलीला अटक केली आहे. आरोपींकडून सात गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी बलराम पालकर यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वालीव पोलीस ठाणे हद्दिमध्ये घरफोडी व चोरी करणारे आरोपीत यांचा घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे. सोनु रामसमुज निषाद (२२) आणि राहुल ननकी पोरटे (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीत यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील सात गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेले दुचाकी, रोख रक्कम, चार चाकी वाहनांचे पार्ट, लॅपटॉप, मोबाईल, कंपनीतील पितळी ब्रास सामान, ऍल्युमिनियम व कॉईल पार्ट, घरातील होम थेअटर असा एकूण १ लाख ३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील कामगिरी सुहास बावचे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - २ वसई, चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलींद साबळे, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे, बाळु कुटे, गजानन गरीबे, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खांडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.