नालासोपारा - राजोडीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये थाटलेल्या बोगस कॉल सेंटरवर अर्नाळा पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटर चालविणाऱ्या, त्यांना मदत करणाऱ्या व जागा मालक अश्या तब्बल ५३ जणांवर गुन्हा दाखल करून १३ तरुणी व ३७ तरुणांना अटक केली आहे. ही सर्व मंडळी महाराष्ट्रात राहणारी नसून दिल्ली, पंजाब, हरियाणा राज्यातील राहणारी असून उच्च शिक्षित आहेत. अर्नाळा पोलीस पुढील गुन्ह्याचा तपास करत चौकशीला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियातील पे पाल बँकेच्या खातेदारकांना इंटरनेट कॉलच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातील पैसे लूटण्याचे काम या बोगस कॉल सेंटरमधून केले जात होते. हे कॉल सेंटर मागील दीड महिन्यापासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
वसईच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक रिसॉर्ट आहेत. अश्यातच राजोडी येथील एका रिसॉर्टमध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाली होती. शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा मारला. यावेळी बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले. रविवार दिवसभर ही कारवाई सुरू होती. ऑस्ट्रेलियाच्या पे पाल या बँकेच्या ग्राहकांचे परस्पर वळवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. अटक आरोपींकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी लोकमतला दिली आहे.