- मंगेश कराळेनालासोपारा - विरारच्या मनवेल पाडा परिसरात दोन आरोपींना ब्राऊन शूगरसह गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केले आहे. दोन्ही आरोपीकडून ३ लाख ९० हजारांचे ३९ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शूगर हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री व तस्करी करणाऱ्या इसमाविरुध्द कडक कारवाई करुन पायबंद घालण्याच्या वरिष्ठ पोलिसांकडून सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार याचे मार्फतीने गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास विरारच्या मनवेल पाडा, ९० फुट रोडच्या चैतन्य हॉस्पिटल जवळील रोड येथून आरोपी अमिर जाकर खान (३५) याच्या कब्जातून २२ ग्रॅम वजनाचे आणि आरोपी हरेश मनोज पटेल (२९) याचे कब्जातुन १७ ग्रॅम असे एकूण ३ लाख ९० हजारांचे ३९ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शूगर अंमली पदार्थ हस्तगत केला आहे. आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमानव्ये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब सागर सोनावणे, गणेश यादव यांनी केली आहे.