नालासोपारा - प्रेयसीची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरून आरोपी पती आणि पत्नीने गुजरात राज्यात विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याची घटना घडली होती. हा गुन्हा उघड करण्यात नायगाव गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी पती, पत्नीला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली.
नायगावच्या सनटेक सोसायटीत राहणाऱ्या नयना रामचंद्र महत (वय २८) हिचा १४ ऑगस्टपासून फोन लागत नव्हता आणि संपर्क होत नव्हता. तिची बहीण जेबा महंत (वय २२) ही घरी गेल्यावरही नयना भेटली नाही. तिच्याबाबत नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली माहिती न मिळाल्याने बहिणीने नायगांव पोलिस ठाण्यात १४ ऑगस्टला हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणी राहात असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
पोलिसांनी एव्हरशाईन सिटीतील अस्टर बिल्डिंगमधील संशयित मनोहर शुक्ला (वय ४३) याला ताब्यात घेतले. त्याने नयनाचा खून केल्याची कबुली त्याने दिली. तरुणीच्या खुनाचा पुरावा नष्ट करण्याकरिता त्याला त्याची पत्नी पूनम शुक्ला हिने मदत केली.