पालघर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा खिंडीतील काळदुर्ग या पर्यटनस्थळावर, नदी-नाले, धबधब्यांवर सध्या पर्यटकांकडून मोठी गर्दी केली जात असून जिल्हाधिकाºयांचा मनाई आदेश मोडून तरुणांचे मोठे गट पावसाचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई आदेश असतानाही कायद्याला न जुमानणाºया बेशिस्त लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.
पालघरमधील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे, नद्या, गडकिल्ले या ठिकाणी जाण्यास कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर व धोकादायक परिस्थिती उद्भवत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मनाई आदेश काढून मज्जाव करण्यात आला आहे. मात्र या आदेशाला जिल्ह्यातील नागरिक केराची टोपली दाखवत असल्याचे समोर येते आहे. जव्हारच्या धबधब्यात अलीकडेच अपघात होऊन पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्याकडे दुर्लक्ष करून रविवारी, सोमवारी असणाºया सलग सुट्ट्यांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात नागरिक गडकिल्ल्यांना भेटी देत आहेत. वाघोबा खिंडीतील काळदुर्ग किल्ल्यावर नागरिक ट्रेकिंगसाठी मोठी गर्दी करत असून पावसाचा आनंद लुटण्यासाठी लहान मुलांना घेऊन अनेक कुटुंबे नदी, धबधब्यांवर जात आहेत. एकीकडे जीवाला धोका तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असतानाही दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात लोक फिरत असून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाकडून काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही पर्यटक केवळ मौजमजा करण्याच्या निमित्ताने पर्यटनस्थळी येत आहेत, तर अनेक जण मद्यप्राशन करण्यासाठी येत असून सोबत महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा सहभाग जास्त असल्याचे दिसून येत आहे.पालघर-मनोर महामार्गावरील काळदुर्ग हा डोंगर उंच असून येथे जाण्यासाठी केवळ पायवाटेचाच पर्याय आहे. पावसाळ्यात ही वाट अतिशय निसरडी असल्याने दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता असते. दुसरीकडे बिबळे, डुक्कर आदी जंगली श्वापदांसह सरपटणाºया विषारी जीवांचा वावरही पर्यटकांच्या जीवावर बेतू शकतो. मात्र अशा कुठल्याही धोक्याची पर्वा न करता फक्त धम्माल आणि काहीतरी अचाट फील अनुभवायच्या मस्तीसाठी सध्या शेकडो लोक फिरत आहेत.सध्या कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य सेवा, पोलीस, जिल्हा प्रशासन जीवापाड मेहनत घेत असताना काही बेकायदेशीर लोक प्रशासनाच्या कामात अतिरिक्त समस्या उभ्या करीत आहेत. अशा बेदरकार वागणाºयांवर कडक कारवाईसाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिली.