वाडा : आदिवासी महिला कार्यकर्ती सरिता जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य बाबाजी काठोले आणि इतर सोळा कार्यकर्त्यांविरोधात आज वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मंत्र्याच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. या विरोधात कालपासून सरिता जाधव या उपोषणाला बसल्या होत्या. तसेच आज श्रमजीवीने पालघर व ठाणे जिल्'ात जोरदारपणे निदर्शने करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा नाकर्तेपणा आणि त्यांच्या समर्थक भाजपा नेत्यांची दडपशाही या विरोधात श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा एक टप्पा आज त्यामुळे यशस्वी झाला. असा दावा संघटनेने केला आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे आदिवासींचे स्थलांतर, कुपोषण, भूकबळी, रोजगार हमी योजनेतील अपहार आणि अनियमितता इत्यादी विषयांवर पूर्णपणे असंवेदनशील आणि उदासीन असल्याचा आरोप श्रमजीवीने केला आहे. वारंवार आंदोलन पत्रव्यवहार सत्याग्रह करून पुराव्यानिशी श्रमजीवीने आपल्या आरोपांना सिद्ध केले आहे. कुपोषित बालकांची संख्या लक्षणीय असताना आदिवासी विकास मंत्री सवरा यांनी कुपोषण नाकारल्याने सर्वत्र संताप व्यक्त झाला आणि या नंतर श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन अनेक आंदोलने केली. ही असंवेदनशीलता अशीच राहिली तर आदिवासी बालकांच्या जीवाशी आम्ही या सरकारला खेळू देणार नाही. या पुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सरकारला दिला आहे. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे नेते केशव नानकर, रामभाऊ वरठा, दत्तु कोळेकर, अशोक सापटे, अनिल जाधव, अनिता धांगडा, विजय जाधव, प्रमोद पवार, कैलास तुबंडा, मिलिंद थुले आदी पदाधिका-यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सवरांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल
By admin | Published: December 09, 2015 12:36 AM