- शशी करपेवसई - विरारमधील आत्महत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक आरोपी असलेल्या गुन्ह्याची नोंद करताना अर्नाळा पोलीस ठाण्यात तपासी अधिकारी म्हणून चक्क सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षकाचे नाव पडले आहे. नव्या उपअधिक्षकांच्या नावे युजर आयडी तयार न झाल्याने हा गोंधळ झाल्याचे उजेडात आले आहे.नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या केलेल्या आपला भाऊ विकास झा ला न्याय मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या अमित झाने २३ जानेवारीला विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनुस शेख, विकास झा आत्महत्या प्रकरणातील आरोपी मुनाफ बलोच, अमर झा आणि मिथिलेश झा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अ़र्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास वसईच्या डीवायएसपींकडे वर्ग करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मात्र, १ सप्टेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्ती झालेले डीवायएसपी अनिल आकडे यांचेच तपासी अधिकारी असे नाव टाकले गेले आहे. शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी अमित झाने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. विकासने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये पोलीस निरीक्षक युनुस शेख आणि मुनाफ बलोच यांचे नाव घेतले होते. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनी फक्त मुनाफ बलोचवर गुन्हा दाखल केला होता. तर तपासात शेख यांना क्लीन चिट दिली होती. या प्रकारानंतर न्याय मिळत नसल्याने अमितला नैराश्य आले होते. अमितने आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंग, डीवायएसपी जयंत बजबले, पोलीस निरीक्षक युुनुस शेख यांच्यावरही आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे संशयाने पाहिले जात होते. असे असताना गुन्हा दाखल करताना सेवानिवृत्त डिवायएसपी अनिल आकडे यांचे नाव एफआयआरमध्ये नोंदले गेल्याने गोंधळ उडाला होता.पद्धत आॅनलाइन मात्र दिरंगाई मोठीएफआयआर सध्या आॅनलाईन पद्धतीने नोंदवला जातो. त्याचे काम विप्रोला देण्यात आले असून पुणे येथून युजर आयडी आणि पासवर्ड तयार केला जातो. अधिकारी बदलल्यानंतर नव्या अधिकाºयाच्या नावाने युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचे काम पुणे येथून केले जाते. त्याआठी दीड दोन महिन्यांचा कालावधी लागतो. याप्रकरणात सेवानिवृत्त डीवायएसपी अनिल आकडे यांच्यानंतर आलेल्या नव्या अधिकाºयाच्या नावाने युजर आयडी आणि पासवर्ड तयार न झाल्याने ही चूक झाल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.
गंभीर गुन्ह्याचा तपास निवृत्ताकडे, गुन्हा दाखल करताना चूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:26 AM