नालासोपारा (मंगेश कराळे) :- दिवसाढवळ्या फक्त ७ मिनिटांत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून १७ गुन्ह्यांची उकल करून १७ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत शनिवारी देण्यात आली आहे. तो मागील तीन वर्षांपासून मोबाईलवर लुडो, विंझो, रश हे ऑनलाईन गेम खेळत असल्याने पैसे संपल्यावर घरफोडी करायचा.
तुंगारफाट्याच्या स्वामी नारायण चाळीत राहणाऱ्या रिंकी सिंग (२९) यांच्या घरी २२ डिसेंबरला दिवसाढवळ्या घरफोडी झाली होती. चोरट्याने बंद घराचे दरवाजाची कडी कशाने तरी तोडून घरात प्रवेश करत सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९० हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेत असताना आरोपी धिरज गुलाब मोर्या (२१) याला आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी पकडून पेल्हार पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी जाऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी आरोपीकडे तपास केल्यावर आरोपीत हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी हा सुमारे दिड वर्षापासुन घरफोडी चोरी करत असल्याचे त्याने कबुली दिली. आरोपीने दहिसर, वालीव, पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत चोरी केलेले २६०.५६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८८८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५८ हजार रुपये रोख रक्कम व १० मोबाईल फोन असे १७ लाख ३१ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडुन हस्तगत केला. त्याच्याकडून घरफोडी, चोरीचे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द वालीव, नायगाव, नालासोपारा, तुळींज आणि मांडवी या ५ पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, राहुल पोळ, अशोक परजने, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी केली आहे.