नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या तरतूदी महानगरपालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून करवून घेत असून मागील पाच वर्षांसाठी १५ कोटी १ लाख ६ हजारांचे साहित्य रुग्णांसाठी खरेदी केले, पण १० कोटी १५ लाख ९८ हजारांचे कोणते इतर साहित्य खरेदी केले असून ते कुठे आहे? हे मात्र गुलदस्त्यात आहे. या खरेदीमध्ये काळा बाजार झाला असून इतर खरेदी केलेले साहित्य व त्यांचे पैसे कोणाच्या घशात गेले असा घणाघाती आरोप राजकुमार चोरघे यांनी केला आहे. वसई विरार महानगरपालिकेकडून आरोग्य विभागाने रुग्णालयात लागणाऱ्या इतर साहित्य खरेदीसाठी केलेला करोडो रु पयांचा खर्च संशयाच्या भोवºयात आला असल्याने पुन्हा एकदा महानगरपालिकेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात वसई येथील सर डी.एम.पेटिट रुग्णालय, नालासोपारा येथील नगीनदास पाडा येथील रुग्णालय, नालासोपारा व सातीवली येथील माता बाल संगोपन केंद्र आणि इतर आठ दवाखान्यामार्फत आरोग्य सेवा चालते. वैद्यकीय आरोग्य विभागाने मागील पाच वर्षात १) रुग्णालय विद्युत जनित्र देखभाल यासाठी १७ लाख ३९ हजार, २) रुग्णालय वातानुकूलीत यंत्रणा दुरुस्तीसाठी ६ लाख ८१ हजार, ३) रुग्णालय स्टेशनरी छपाईसाठी ७६ लाख ८० हजार, ४) रु ग्णालय स्टेशनरी खरेदीसाठी ३१ लाख ६७ हजार, ५) रुग्णालय ध्वनी प्रक्षेपण दुरुस्तीसाठी २० हजार, ६) रुग्णालय इन्व्हर्टर दुरुस्तीसाठी ४० हजार, ७) रुग्णालय किरकोळ खर्चासाठी ८ लाख २१ हजार, ८) रुग्णालय विद्युत जनित्र डिझेल खर्चासाठी २२ लाख ६१ हजार, ९) रुग्णालयीन उपकरणे देखभाल दुरुस्तीसाठी ९ कोटी ८० लाख २४ हजार, १०) रु ग्णांसाठी कपडे, चादरी, खरेदीसाठी सव्वा कोटी ११) रु ग्णांना भोजन, चहापान व अल्पोपहारासाठी २ कोटी ३२ लाख २३ हजार असे एकूण १५ कोटी १ लाख ६ हजार एवढे पैसे खर्च केलेले असतानाही मग १० कोटी १५ लाख ९८ हजार रु पयांचे इतर कोणते साहित्य खरेदी केले असा प्रश्न विचारला असून तिजोरीची लूट करून सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.आरोग्य विभागात ही हातचलाखी कोण करत आहे, याचा गोल्डन ठेकेदार कोण आहे, याचे लाभार्थी कोण आहे असे अनेक प्रश्न महानगरपालिकेला विचारत आरोपकर्त्याने चौकशीची मागणीही केली असून असे खोटे लेखाशीर्ष अर्थसंकल्पनातून काढून टाकण्याची विनंती केली आहे.वसई विरार मनपाच्या आरोग्य विभागाने खोट्या लेखाशीर्षमधून लूटमार कशी करता येईल याचे उत्तम उदाहरण देऊन कायदा पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने काम करण्याची कार्यपद्धती अनेक महिन्यापासून सुरू असल्याचेही सांगितले आहे.
वैद्यकीय आरोग्य विभागाने ५ वर्षांमध्ये १५ कोटी १ लाख ६ हजारांची साहित्य खर्च केले होते. मग १० कोटी १५ लाख ९८ हजारांचे इतर कोणते साहित्य खरेदी केले व खरेदी केलेले इतर साहित्य कुठे आहे? यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. आयुक्तांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी.- राजकुमार चोरघे, आरोपकर्तेआरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नेमके यात काय झाले आहे? हे त्यांना विचारावे ते तुम्हाला सांगतील.- बळीराम पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिकाफेब्रुवारी २०१९ ला आरोग्य विभागाचा पदभार घेतला असून मागील पाच वर्षात काय झाले, या प्रकरणाची मी चौकशी करून नेमका घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला आहे का याचा तपास करते. प्रसिद्धीसाठी कोणीही बातमी किंवा माहिती देतांना संबंधित प्रकरणाची योग्य ती माहिती घ्यावी.- तबसुम काझी, आरोग्य अधिकारी