नालासोपारा : श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र असल्यामुळे वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर मंदिरातील शंकर आणि नागदेवतांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण महिना सुरू झाल्याने भाविकांची पावले या मंदिराकडे वळत आहेत. ८ ते १० कावडिया ग्रुपने तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे आणि नाग देवतांचे दर्शन घेतले आहे.‘बम बम भोले... हर हर महादेव’च्या गजरात श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी वसईत प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. तर कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी वालीव पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.तुंगारेश्वर डोंगरावर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात येथे लाखो भक्त येतात. श्रावणी सोमवारचे महत्त्व अधिक असल्याने भाविकांची येथे गर्दी होत असते.नागपंचमी उत्साहात : आज संपूर्ण तालुक्यात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. खेडोपाडी गावातच पूजा मांडून ठिकठिकाणी पुजेसाठी सुवासिनींनी गर्दी केली होती. जिवंत नागास जबरदस्तीने दूध प्राशन करण्यास लावणाऱ्या गारूड्यांवर शासनाने बंदी घातल्याने धातूच्या नागाचे पूजन केले.शिव मंदिरात शुकशुकाटवाडा : तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बहुतेक गावांमध्ये पाणी भरल्याने काही गावांचे रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा परिणाम आज पहिल्या श्रावणी सोमवारवर देखील झालेला दिसला. शिव मंदिरांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. वाड्यात तिळसे येथील ऐतिहासिक तिळसेश्वर महादेवाचे मंदिर, आंबिस्ते येथील नागनाथ मंदिर, कोंढले, घोडमाळ, नारे या ठिकाणी प्रसिद्ध शिव मंदिरे आहेत.
तुंगारेश्वरला भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:23 PM