विक्रमगड : जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगली हजेरी लावली असून, विविध वृक्षप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर घर, बंगला अथवा परसबागेत, वाडी, मळ्यात शेतावर, बागेत लावण्यासाठी फुले, फळझाडांसह शोभेच्या झाडांची मागणी वाढत आहे. त्यामुळे विक्र मगड परिसरातील अनेक नर्सरी, रस्त्याच्या कडेच्या रोपविक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
पावसाळ्यात अनेक वृक्षप्रेमी घराच्या अंगणात लावण्यासाठी, परस बागेत, शेतावरचा मळ्यावर फळ झाडे लावण्यासाठी इनडोअर नर्सरीसाठी विविध प्रकारच्या फळ - फूल झाडांची कलमे विकत घेत असल्याचे दिसते. याशिवाय शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालय यांच्याकडून सावली देणाऱ्या झाडांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असून अगदी कमी किंमत असलेल्या गुलमोहर म्हणजे ५० रुपयांपासून महाग म्हणून उपलब्ध होणाºया वडाच्या झाडांची म्हणजे २५० रुपयांपर्यंतच्या रोपांना मागणी वाढत असल्याचे गडदे येथील साईदीप नर्सरी चालक महेंद्र बांडे यांनी सांगितले. शेतकरी वर्ग देखील आपल्या शेतात फुलशेती करण्यासाठी या दरम्यान झेंडू, गुलाब, मोगरा, सोनचाफा सारख्या फुलांच्या रोपांची मागणी नोंदविताना दिसत आहे.
पाली-विक्र मगड मार्गावरील ओंदे येथील नर्सरीत आयुर्वेदात उल्लेख असलेली विविध प्रकारची झाडे उपलब्ध होतात. मुंबई, ठाणे, वसई परिसरातील फार्म मालक मोठ्या प्रमाणात या वनौषधींची रोपे खरेदी करताना दिसतात.
पावसामुळे विविध प्रकारचे वृक्ष व फुले-फळझाडे लावण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरीक रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. विविध नर्सरीत विविध जातीची शोभिवंत, वनऔषधी, फळांची, फुलांची योग्य वयानुसार कलमे (रोप) उपलब्ध आहेत. - महेंद्र बांडे, (साईदीप नर्सरी, संचालक)