मुंबई : काही वर्षांपूर्वी दिवाळीसाठी आप्तेष्टांच्या भेटीला जाताना घरातील फराळ घेऊन जाण्याची रीत होती. काळानुरूप हे चित्र पालटले आहे. गेल्या २-४ वर्षांपासून बाजारात गिफ्ट्सची संस्कृती उदयास येऊन स्थिरस्थावर झाली आहे. या गिफ्ट्सच्या ट्रेंड्समध्ये कस्टमाइज्ड करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येतो. शिवाय, याचे वैशिष्ट्य म्हणजे कॉर्पोरेट विश्वातील गिफ्ट्सच्या ट्रेंड्समध्ये कोट्यवधींची उलाढाल होते आहे. परदेशातील चॉकलेट्स, ज्यूस, कँडी या उत्पादकांची गिफ्ट्स पॅकमध्ये वर्णी लागली आहे.पूर्वी काजू कतली आणि खव्यापासून बनविलेल्या मिठाईला विशेष महत्त्व होते. पण कालांतराने मिठाईच्या जोडीला सुकामेवा आणि खव्यापासून बनविलेली मिठाई फ्रीजबाहेर राहिली, तर अल्प काळात खराब होत असल्यामुळे सुक्यामेव्याच्या जोडीला विविध फ्लेवरमधले चॉकलेट दिले जाऊ लागले. त्यात देशी-विदेशी कंपन्या चॉकलेट गिफ्ट घरी पोहोचविण्याचीदेखील सुविधा देत असल्यामुळे चॉकलेट सध्या ट्रेंडिंगला असल्याचे पाहायला मिळत आहे. चॉकलेट गिफ्ट देताना त्याचे पॅकिंग आकर्षक असेल तर ते समोरच्या व्यक्तीला आकर्षित करते. त्यामुळे फ्लेवरप्रमाणेच पॅकिंगलाही तितकेच महत्त्व आहे. याविषयी, क्रॉफर्ड मार्केट येथील विक्रेत्याने सांगितले की, अमेरिका, तुर्की, दुबई आणि चीन या देशांतून चॉकलेट्स येतात. या चॉकलेट्सची खासियत म्हणजे यात तुर्की देशातील सौम्य फ्लेवर्सची चॉकलेट्स अधिक पसंतीस उतरतात.केवळ कॉर्पोरेट विश्वात असणारे गिफ्ट कल्चर आता कुटुंबांच्या गेटटुगेदरसाठीही हा पर्याय निवडताना दिसत आहे. त्यातही ड्रायफ्रूट परडी, चॉकलेट परडी, चॉकलेट बॅग, चॉकलेट्स बुके असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. शिवाय आपल्या प्रियजनांसाठी हार्टच्या आकाराचे गिफ्ट्सरॅप आहेत. या गिफ्ट्समध्ये तुमच्या आवडीप्रमाणे विविध आकारांत आणि डार्क, मिल्क, व्हाईट, कॅरेमल अशा विविध फ्लेवरमध्ये हे चॉकलेट उपलब्ध आहेत. त्यातही आपल्या आवडीप्रमाणे चॉकलेट्स निवडून त्यात पणत्या, ज्यूस बाटली, चॉकलेट सिरप असे प्रकार निवडून त्याचे एकत्रितरीत्या गिफ्टस् बनवू शकता. याशिवाय, चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करूनही गिफ्ट्स तयार करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. या गिफ्ट्सची किंमत १५० रुपयांपासून ते थेट आठ हजारांपर्यंत आहे.विशेष बॉक्स दिल्ली व चीनमधूनगिफ्ट्सच्या सर्वाधिक आॅर्डर्स या कॉर्पोरेट विश्वातून येतात. त्यासाठीचे आकर्षक बॉक्स हे विशेषत: चीन आणि दिल्लीतून येतात. मुंबईतही काही ठिकाणी यांची निर्मिती केली जाते. कॉर्पोरेट्सच्या काही नामांकित कंपन्यांच्या आॅर्डर्स कोटींच्या घरातही असतात. मात्र आता हाच ट्रेंड कुटुंब विश्वातही दिसतोय. दिवाळीकरिता फॅमिली गेटटुगेदरसाठीही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गिफ्टस् दिले जात आहेत, अशी माहिती क्रॉफर्ड मार्केट येथील विक्रेत्याने दिली.
‘कस्टमाइज्ड’ गिफ्टसला ग्राहकांची पसंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:51 PM