नालासोपारा : कर्तव्यावर असलेल्या पाेलिसांना काेराेना हाेण्याचे प्रमाण वाढले असताना या आजारातून बरे हाेणाऱ्या मीरा-भाईंदर, वसई आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दोन वेळा नालासोपाऱ्याच्या साथिया ट्रस्ट रक्तपेढीत कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी ‘कॉन्वालेसंट’ प्लाझ्मा दान केले आहे. त्यांनी काेराेना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी उचललेल्या या पावलाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. त्यांनी इतरांनाही प्लाझ्मादान करून काेराेनाविरुद्धच्या या लढ्यात सहभागी हाेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना महामारीतील अतिगंभीर कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी १४ सप्टेंबर आणि २० ऑक्टोबर या दिवशी दोन वेळा कॉन्वालेसंट प्लाझ्मा दिला असल्याचे वनकोटी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी प्लाझ्मा दान करून कोविड रुग्णांना या आजारातून बरे होण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
आतापर्यंत अनेक पुरुष, महिला, तरुणींनी प्लाझ्मा दान केलेले आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दोन वेळा प्लाझ्मा दान केले आहे. कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा घटकाचे विलगीकरण करून कोविड रुग्णाच्या उपचारांसाठी या प्लाझ्माचा वापर केला जातो. कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन साथिया ट्रस्ट रक्तपेढीचे चेअरमन विजय महाजन यांनी केले आहे, तसेच पोलिसांनी प्लाझ्मादान करण्यास पुढे येण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
प्लाझ्मा थेरपी काय आहे?
एखादा विषाणू शरीरात शिरला की आपले शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करते. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपले शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करते. या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने दोन हात करू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.