बोर्डी : डहाणू तालुका कृषी विभागाने लॉकडाउन कालावधीत प्रशासकीय मंजुरीची १३१ कामे घेऊन ३३ गावातील २२० ठिकाणी ६०९ मजुरांच्या हाताला काम दिले आहे.
लॉकडाउनचा कालावधी जसा वाढतोय, तशी हातातील रोख रक्कम कमी होत असल्याने हातावर पोट असणाऱ्या आदिवासी मजुरांचे मानसिक दडपण वाढत आहे. हा जिल्हा रेड झोन घोषित झाल्याने लॉकडाउन शिथील झाले तरी आगामी काळात पावसाळा सुरू झाल्यावर रोजंदारीची कामे मिळणार नाहीत. त्यामुळे आताच हाताला मिळेल ते काम करण्याची मागणी या मजुरांकडून होत आहे.तालुका कृषी विभागाने त्यांचा हा प्रश्न काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार तालुक्यातील विविध गावांमध्ये भात खाचरांच्या जुन्या बांधदुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता घेऊन, आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून मजूर काम करत आहेत. त्याचप्रमाणे वैयक्तिक पातळीवर फळबाग लागवडीअंतर्गत बांधबंदिस्ती अशा कामांचाही समावेश त्यामध्ये आहे. ही कामे विविध ३३ गावात २२० ठिकाणी सुरू असून तेथे ६०९ मजुरांना काम मिळाले आहे.
शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीच्या कामाची मजुरी मजूराच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तसेच मे महिन्यात मजुरांना कामे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.