अनिरुद्ध पाटीलबोर्डी : चल धन्नो म्हणत टांगा हाकणारी शोले चित्रपटातील हेमामालिनी सर्वांना परिचित आहे. मात्र डहाणू तालुक्यातील घोडेवाल्याच्या पत्नीने, त्या पेक्षा एक पाऊल पुढे टाकत थेट वरातीकरिता लग्न मंडपापर्यंत घोडा घेऊन जाण्याचे धाडस केले आहे. रियल लाईफमध्ये तिने दाखवलेल्या या कामाचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे.लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसलेला नवरदेव आणि त्या मागे नटून-थटून चालणाऱ्या महिला असे चित्र पाहायला मिळते. विशेषत: मुहूर्तावर लग्न करण्याला प्राधान्य दिले जाते. तथापि एकाच दिवशी अनेक ठिकाणी लग्न कार्य असतात. त्यामुळे मंडपवाले, बेंजोवाले, केटरर्स म्हणा किंवा घोडेवाले या सर्वांची धावपळ उडते. त्यातही जेमतेम एक ते दोन तासांकरिता वरातीसाठी घोडा लागतो. हाच कालावधी म्हणजे चार पैसे गाठीला जमवायची संधी असते. ती दवडून कशी चालेल, म्हणून घोडेवाल्याचा सर्व परिवार नियोजन आखून या काळात आपली भूमिका बजावताना दिसतात. या मध्ये आपलाही महत्वाचा वाटा असावा म्हणून डहाणू तालुक्यातील आगर गावातील घोडेवाल्याची पत्नीच पुढे सरसावली आहे.बुधवार, २ मे रोजी चिखले गावातील एका लग्न कार्यासाठी नवरदेवाकरीता सजवलेल्या घोड्याला घेऊन ती थेट लग्न मंडपापर्यंत गेली. हे अनोखे आणि अपरिचित चित्र पाहून ग्रामस्थांमध्येही कुतूहल निर्माण झाले. त्यानंतर तिला पाहण्याकरिता अनेकजण रस्त्यावर आले.त्या पैकी काहींनी मोबाईल काढून हे दृश्य कॅमेºयात टिपले. दरम्यान अंतराळापासून ते चक्क सैन्यात भरती होत महिलांनी आपले अस्तित्व सर्वच क्षेत्रात दाखवून दिले आहे. त्या मध्ये या ग्रामीण महिलेची भर पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती. तिने दाखवलेली हिम्मत पाहून तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. ग्रामस्थांमध्ये हा कुतूहलाचा विषय आहे.
घोड्याची वेसण हातात घेऊन निघाली डहाणूची बसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 12:30 AM