अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - कैनाड गावच्या मेरेपाड्यावरील आदिवासीच्या घरातून सोमवार, 8 जुलैच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास 9 फूट लांब 13 किलो वजनाच्या मादी अजगराला पकडण्यात सर्पमित्राला यश आले. रविवार 7 जुलै रोजी सावटा गावच्या घोनगरपाडा येथे घराच्या आवारातून 11 फूट लांब आणि 16 किलो वजनाची अजगराची मादी पकडली होती.या तालुक्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून मोठे क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पायथ्यालगतच्या गावांमध्ये विविध जातींचे साप वस्तीत शिरण्याच्या घटना घडतात. याकरिता वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन ही संस्था वन विभागाच्या माध्यमातून अशा सापांचे रेस्क्यू करून पुन्हा जंगलात सोडते. सावटा गावातील घटनेत सर्पमित्र सागर पटेल आणि एरीक ताडवाला यांनी रेस्क्यू केले. तर सोमवारी पहाटे कैनाड या गावातून अजगर घरात शिरल्याबाबत लाडकू भिव्या मेरे यांनी संपर्क साधल्यानंतर सागर पटेल यांनी घटनास्थळी जाऊन झोपडीच्या छतातून आत प्रवेश करणाऱ्या मादी अजगराला पकडले. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.